मराठा समाजाला आंदोलनाची वेळ ठाकरे सरकारने येऊ द्यायला नको होती// उस्मानाबाद शहरातील एका नामांकित खाजगी रुग्णालयाकडून रुग्णांची लूट //महाराष्ट्रात ३४ हजार ३४५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू//लातुर 294 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 178 नवीन बाधित

मराठा समाजाची नाशिक येथे रविवारी राज्यव्यापी विशेष बैठकीचे आयोजन...


-------------------------------------------------------------


मराठा समाजाला आरक्षणासाठी आंदोलनाची वेळ ठाकरे सरकारने येऊ द्यायला नको होती.


ठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ आली आहे असा आरोप केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे केला आहे. ही आंदोलन करण्याची वेळ फक्त ठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आली आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली हे या सरकारचं अपयश आहे. सरकारने योग्य पद्धतीने बाजू मांडली नाही त्यामुळे स्थगिती मिळाली असंही त्यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे भाष्य केले आहे.



तामिळनाडू सरकारने ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने तेथील आरक्षणाचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात गेला. सुप्रीम कोर्टाने त्यांचं आरक्षण प्रकरण पूर्ण पीठाकडे पाठवलं. दुसऱ्या बाजूला ठाकरे सरकारने आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर भक्कमपणे बाजू मांडण्याची गरज होती. ते केलं गेलं नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली असा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला आहे. दोन्ही राज्यांची तुलना केली तर तामिळनाडूचं सरकार यशस्वी ठरलं आणि ठाकरे सरकार आरक्षणाच्या मुद्यावर अपयशी ठरतं. ही स्थगिती उठवण्यासाठी ठाकरे सरकारने पूर्ण प्रयत्न केले पाहिजेत, असं झालं तरच मराठा समाज शांत होईल अन्यथा ठाकरे सरकारला या सगळ्याचे परिणाम भोगावे लागतील असंही दानवे यांनी स्पष्ट केलं. मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. यानंतर ठाकरे सरकारवर विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. मात्र आपण मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही. त्यांच्या न्याय हक्काच्या लढाईत त्यांना साथ देणार असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. तसंच कॅबिनेटच्या बैठकीत मराठा आरक्षणाचा विषय समोर आला तेव्हा मराठा समाजाचे विद्यार्थी आणि तरुण यांच्यासाठी काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले होते. दरम्यान आज रावसाहेब दानवे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर टीका केली. सरकारने योग्य पद्धतीने बाजू मांडली असती तर आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाली नसती असंही त्यांनी म्हटलं आहे.


 -----------------------------------------------------------------------


उस्मानाबाद शहरातील एका नामांकित खाजगी रुग्णालयाकडून रुग्णांची लूट


उस्मानाबाद शहरातील एका नामांकित खाजगी रुग्णालयाकडून अँटीजेन टेस्टसाठी दोन हजार रुपये आकारले जात असल्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. श्री. दादा कांबळे, जिल्हा सचिव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उस्मानाबाद यांनी सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल येथे कोविड-19 रुग्णांकडून अँटीजेन टेस्टसाठी शासकीय दर 600 रुपये असताना रुग्णांच्या नातेवाईकांकडून रु. 2000/- इतकी रक्कम घेतली जात असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे.त्यानुसार सहयाद्री हॉस्पीटल,उस्मानाबाद या रुग्णालयाच्या तपासणीसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी/ऑडिटर/कर्मचारी यांना तपासणी करुन अहवाल सादर करणेबाबत सूचित केले होते. सहयाद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल,उस्मानाबाद यांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा सादर करणेबाबत सूचित केले होते.



  सहयाद्री हॉस्पीटल,उस्मानाबाद करिता नियुक्त केलेले तपासणी अधिकारी श्री.शफीक कुरणे,उप कोषागार अधिकारी उ.श्रेणी,जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालय,उस्मानाबाद यांनी तपासणी अहवाल सादर केला आहे.तसेच सहयाद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल उस्मानाबाद यांचा खुलासा प्राप्त झाला आहे.
    त्यानुसार सह्याद्री मल्टिस्पेशालिटी उस्मानाबाद येथे रॅपिड अँटीजेन टेस्ट केलेल्या एकूण-82 रूग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 73 रुग्णांना रॅपिड अँटीजेन टेस्ट करिता आकारलेल्या रक्कमेची पावती देण्यात आली आहे. तर 9 रुग्णांना पावती देण्यात आलेली नाही. रॅपिड अँटीजेन टेस्टची पावती देण्यात आलेल्या 73 रुग्णांपैकी66 रुग्णांना प्रत्येकी रु.2000/- 5 रुग्णांना प्रत्येकी रु. 1600/- व 2 रुग्णांना प्रत्येकी रु. 1500/- इतकी रक्कम रॅपिड अँटीजेन टेस्टसाठी आकारल्याचे दिसून येते.      
शासन निर्णय दि. 7 ऑगस्ट 2020 नुसार रुग्ण स्वतःहून हॉस्पीटल मध्ये कोविड-19 रॅपिड ॲटीजेन तपासणी करिता आले असेल तर त्याला कमाल रु.600/- इतका दर आकारणे आवश्यक असल्यामुळे वरिल नमूद केलेल्या 73 रूग्णांपैकी 66 रुग्णांकडून प्रत्येकी रु. 1400/-, 5 रुग्णांकडून प्रत्येकी रु. 1000/- व 2 रुग्णांकडून प्रत्येकी रु. 900/- याप्रमाणे एकूण रु. 99,200/- इसकी रक्कम जास्त आकारली असल्याचे दिसून येत असल्याने सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, उस्मानाबाद यांनी शासन निर्णयाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे व्यवस्थापक, सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, उस्मानाबाद यांनी सादर केलेला खुलासा संयुक्तिक असल्याचे दिसून येत नाही.
     जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,उस्मानाबाद यांनी प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल,उस्मानाबाद या रुग्णालयाने कोविड-19 च्या रॅपिड अँटीजेन टेस्टकरिता रुग्णांना शासनमान्य दरापेक्षा जास्त आकारणी करणे तसेच काही रुग्णांना रॅपिड अँटीजेन टेस्टच्या देयकाची पावती न देणे अशा गंभीर स्वरुपाचे कृत्य केले असल्याने सदर प्रकरणी पुढील प्रमाणे कार्यवाही करणेबाबत आदेश दिले आहेत. सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, उस्मानाबाद यांना कोविड-19 ची रॅपिड अँटीजेन टेस्ट करणेस या आदेशानंतर पुढील कालावधीत प्रतिबंधामनाई करण्यात येत आहे. व्यवस्थापक, सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, उस्मानाबाद यांनी या आदेशात नमूद केलेल्या पावती दिलेल्या 73 रुग्णांना रॅपिड अँटीजेन टेस्टसाठी शासनमान्य दरानुसार रु. 600/- इतक्या रक्कमपेक्षा अधिकची आकारलेली रुग्णनिहाय रक्कम (एकुण रक्कम रु. 99,200/-) तसेच पावती न दिलेल्या 9 रुग्णांना रॅपिड अँटीजेन टेस्टसाठी शासनमान्य दरानुसार रु. 600/- इतक्या रक्कमपेक्षा अधिकची आकारलेली रुग्णनिहाय रक्कम त्या त्या रुग्णाच्या (एकुण 82 रुग्ण) बँक खात्यावर या आदेशाच्या दिनांकापासून 8 दिवसांचे आत जमा करावी व त्याबाबतचा अनुपालन अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे सादर करावा.
 सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, उस्मानाबाद यांनी रॅपिड अँटीजेन टेस्ट केलेल्या 9 रुग्णांना पावती दिली नसल्याचे दिसून आले असून त्यामुळे त्यांनी भारतीय साथरोग अधिनियम 1897, महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020 व शासन निर्णयातील तरतुदींचे उल्लंघन केले आहे. या उल्लंघनाकरिता सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, उस्मानाबाद यांना रु. 10,000/- दंड आकारण्यात येत असून व्यवस्थापक, सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, उस्मानाबाद यांनी सदर दंडाची रक्कम तहसिल कार्यालय, उस्मानाबाद येथे विहित लेखाशिर्षाखाली जमा करावी व त्याबाबत अनुपालन अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष,जिल्हाधिकारी कार्यालय,उस्मानाबाद येथे सादर करावा.
   या आदेशाचे उल्लंघन केल्यास सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, उस्मानाबाद हे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020 चे नियम 11, भारतीय साथरोग अधिनियम 1897 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व  बॉम्बे नर्सिग होम्स रजिस्ट्रेशन ॲक्ट 1949 व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील. असे ही आदेशात  नमुद केले आहे.


 ----------------------------------------------------------------------------



लातूर जिल्हा :




आज प्राप्त झालेल्या 352 RTPCR अहवालांपैकी 221 अहवाल निगेटिव्ह आले असून 124 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच आज 841 Rapid Antigen Test पैकी 170 रुग्ण पॉझिटिव्ह तर 671 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.  RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 294 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 15587 झाली आहे, तर 12063 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2083 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 990 पॉझिटिव्ह रुग्ण स्वतःच्या घरी विलगीकरणात आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 451 वर पोहोचला आहे.

 


----------------------------------------------------



उस्मानाबाद जिल्हा :


आज प्राप्त झालेल्या 149 RTPCR अहवालांपैकी 44 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 92 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 10 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 569 Rapid Antigen Test पैकी 134 रुग्ण पॉझिटिव्ह तर 435 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 178 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 11050 झाली आहे तर 8021 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2682 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा  331 वर पोहोचला आहे.


------------------------------------------------------------


महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये १९ हजार १६४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. या रुग्णसंख्येमुळे सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या १२ लाख ८२ हजार ९६३ इतकी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये ४५९ मृत्यूंची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ३४ हजार ३४५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील २४ तासांमध्ये १७ हजार १८४ रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ९ लाख ७३ हजार २१४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे





Popular posts